जामनेर ग्रामीण | प्रतिनिधी : शेख शफी लियाकत (वाघ्र शौर्यम न्यूज)- जामनेर तालुक्यातील सांगवी गावात आईला शिवीगाळ व मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका युवकावर चाकूने वार केल्याची गंभीर घटना दिनांक 13 रोजी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी येथील रहिवासी व मजुरी करून उदरनिर्वाह करणारे हुसेन वजीर तडवी यांनी गावातील शरीफ सलीम तडवी यास “माझ्या आईला शिवीगाळ व मारहाण का केली?” असा जाब विचारला. याचा राग आल्याने शरीफ तडवी याने कांदा कापण्याच्या सुरीने हुसेन तडवी यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूस वार करून गंभीर दुखापत केली.
या घटनेप्रकरणी रोशन तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्टेशनला शरीफ सलीम तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी राहुल पाटील करीत आहेत.





