जामनेर ग्रामीण | प्रतिनिधी : शेख शफी लियाकत (वाघ्र शौर्यम न्यूज) – जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात सागर साहेबराव सोनवणे या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी सागर सोनवणे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळी टाकून दिले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी सागर याला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. मात्र खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.




