भुसावळ – दि 15 डिसेंबर 2025 उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी ‘ रेबीज ‘ आणि ‘ ॲनिमिया ‘ या विषयांवर एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री सय्यद नविद सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
या कार्यशाळेत आरोग्य तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना रेबीज या प्राणघातक आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली. कुत्रा, मांजर किंवा इतर प्राणी चावल्यास जखम त्वरित साबणाने १५ मिनिटे स्वच्छ धुणे आणि तातडीने लस घेणे किती महत्त्वाचे आहे, हे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगण्यात आले. रेबीज हा पूर्णपणे प्रतिबंधात्मक आजार असून वेळीच उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो, यावर डॉक्टरांनी भर दिला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘ ॲनिमिया ‘ ( रक्तक्षय ) या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वाढणारे रक्तक्षयाचे प्रमाण चिंताजनक असून, ते टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, गूळ, शेंगदाणे आणि लोहयुक्त आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता आणि सकस आहाराबाबत प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी शालेय आरोग्य समितीचे सदस्य, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेच्या शेवटी शंका-निरसन सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. शिक्षिक श्री नासीर हुसेन यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.





