जामनेर : हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या तसेच संघर्षाचा वारसा असलेल्या बंजारा समाजालाही हैदराबाद गॅजेटनुसार तसेच विविध आयोगाच्या शिफारशीनुसार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण मिळावं याकरिता जामनेर तालुक्यातील सर्व बंजारा समाज बांधव, युवा, जेष्ठ, महिला एकत्रित येऊन हजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
आज जामनेर शहरात पाचोरा रोड येथील बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन सहभागी होऊन समाजाच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शविला. बंजारा समाजाची अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी असून, महायुती सरकार या मागणीची गांभीर्याने दखल घेत आहे. समाजाच्या हक्क, न्याय व प्रगतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, यावर सरकार ठाम आहे. बंजारा समाजाला न्याय मिळावा, यासाठी प्रशासन आणि शासन यांच्यात समन्वय साधून निर्णय प्रक्रियेत गती येईल, असा विश्वास यावेळी ना गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.
सामाजिक सलोखा, समान संधी आणि सर्वसमावेशक विकास हेच महायुती सरकारचे ध्येय असून, समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याच्या प्रतिक्रिया ना. महाजन यांनी दिल्या एसटी प्रवर्गात आरक्षण मिळविण्यासाठी घोषणा देण्यात आल्या तसेच फलक घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले. राजमाता जिजाऊ चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चेकर्यांनी काही काळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी मोर्चेकऱ्यांना समजावून मोर्चा पुढे मार्गस्थ केला. तहसील कार्यालयात तहसीलदार नानासाहेब आकडे यांना बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी जामनेर तालुका बंजारा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.