नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.17) आपला ७५ वा वाढदिवस मध्य प्रदेशात साजरा करत असून हा क्षण विशेष ठरणार आहे. मोदी दुसऱ्यांदा मध्य प्रदेशाच्या भूमीवर वाढदिवस साजरा करत आहेत. याआधी २०२२ मध्ये ७२ व्या वाढदिवसाच्या दिवशी कूनो नॅशनल पार्कमध्ये चिते सोडून ‘प्रोजेक्ट चीता’ची सुरुवात त्यांनी केली होती.
आज ते धार जिल्ह्यातील भैंसोला गावात आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन देशभरासाठी महत्त्वाच्या योजना समर्पित करणार आहेत. यामध्ये देशातील पहिला पीएम मित्र टेक्सटाईल पार्क, ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार आणि पोषण अभियान’, तसेच आदि सेवा पर्व यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. यावेळी राज्यपाल मंगुभाई पटेल आणि मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित राहणार आहेत.
महिला व बाल आरोग्यासाठी नवे अभियान
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार आणि पोषण अभियान’ अंतर्गत महिलांचे आरोग्य तपासणी शिबिरे, ॲनिमिया प्रतिबंध, संतुलित आहार तसेच मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. महिला व किशोरवयीन मुलींना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देत समाजातील सशक्त कुटुंबव्यवस्थेला चालना देणे हा यामागील उद्देश आहे.
टेक्सटाईल हबकडे मोठे पाऊल – पीएम मित्र पार्क
मोदी देश व राज्यातील पहिल्या ‘पीएम मित्र पार्क’ची पायाभरणी करतील. २१५८ एकर क्षेत्रात विकसित होणाऱ्या या पार्कमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प, अत्याधुनिक रस्ते, पाणी–वीज व्यवस्था आणि ८१ ‘प्लग-अँड-प्ले’ युनिट्स तयार होतील. आतापर्यंत २३,१४६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले असून, यामुळे ३ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळण्यासही मदत होईल.
इतर महत्त्वाच्या घोषणा व उपक्रम
-
पंतप्रधान मातृत्व वंदना योजना: देशभरातील पात्र महिलांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतर.
-
सुमन सखी चॅटबॉट: ग्रामीण व दुर्गम भागातील गर्भवती महिलांसाठी माहिती सेवा.
-
सिकल सेल स्क्रिनिंग: १ कोटीव्या कार्डचे वितरण, या आजाराविरुद्धच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा.
-
एक बगिया माँ के नाम: महिला बचत गटांना रोपे वाटप, पर्यावरण व आर्थिक सक्षमीकरणासाठी उपक्रम.