मुंबई : गेल्या काही वर्षांत बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रिटींनी वैवाहिक आयुष्याचा शेवट करत घटस्फोट घेतल्याची प्रकरणे समोर आली आहेत. चाहत्यांसाठी ही नेहमीच धक्कादायक बाब ठरते. आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेता वरुण कपूर याने १२ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरुण कपूर आणि त्याची पत्नी धान्या मोहन यांनी दोन आठवड्यांपूर्वीच परस्पर संमतीने घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली. सध्या वरुण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत असून या प्रकरणी दोघांनीही अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.
२०१३ मध्ये वरुण आणि धान्या विवाहबंधनात अडकले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. याबाबत वरुणनं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “धान्या नेहमी प्रवासात असते आणि मी शूटिंगमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे आमचं नातं अर्धं विवाहित आणि अर्धं बॅचलरप्रमाणेच वाटतं. महिन्यातून जवळपास १५ दिवस मी एकटाच घर सांभाळतो.”
वरुण कपूरनं ‘स्वरागिनी – जोडे रिश्तों के सुर’, ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय संजय लीला भन्साली दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी चित्रपटातही त्याने भूमिका साकारली होती. सध्या मात्र वरुण आणि धान्या यांचं नातं अधिकृतपणे तुटलं असून चाहत्यांमध्ये या घटनेची चर्चा रंगू लागली आहे.