मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सर्वसामान्यांची दिवाळी सुखाची होईल” असे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरले आहे. सोमवारी, घटस्थापनेच्या दिवशीपासून जीएसटी २.०ची अंमलबजावणी सुरू झाली असून ३७५ ग्राहकोपयोगी वस्तूंवर करकपात करण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सपासून पनीरपर्यंत अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
जीएसटी दरात ५ आणि १८ टक्के अशी कपात झाल्याने बाजारात लगेचच दरकपातीचा परिणाम जाणवू लागला. उदा., वातानुकूलन यंत्रांच्या (एसी) किंमतीत तब्बल ७ ते ८ टक्क्यांची घट झाली. पूर्वी ४० हजार रुपयांचे एसी आता सुमारे ३७ हजार रुपयांना विकले जात आहेत. त्याचप्रमाणे टीव्ही सेट्सच्या किंमतीतही इतकीच घट झाली आहे.
इलेक्ट्रॉनिक विक्रेते प्रवीण जैन यांनी सांगितले की, “टप्प्याटप्प्याने सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार आहेत. सध्या टीव्ही आणि एसीच्या दरांत घट झाली आहे. मात्र इतर वस्तूंच्या कमी किंमती या जीएसटी कपातीबरोबरच सणासुदीच्या सवलतींमुळे दिसत आहेत.”





