जळगाव : मराठा समाजातील महिलांबद्दल अश्लील भाष्य करणाऱ्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अखेर सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
सप्टेंबर 2022 मध्ये बकाले याचे अधिनस्त पोलीस कॉन्स्टेबल अशोक महाजन याच्यासोबत फोनवर संभाषण झाले होते. त्यावेळी बकाले याने मराठा समाज व महिलांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले होते. या कॉलची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होताच राज्यभरात संताप उसळला. जळगावातील छत्रपती शिवाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी आंदोलन करून बकालेला बडतर्फ करण्याची मागणी केली होती.
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या चौकशीत त्याच्यावर कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला. समक्ष सुनावणीची संधी मिळूनही नवीन मुद्दे मांडण्यात तो अपयशी ठरल्याने अखेर त्याला सेवेतून काढण्यात आले.
छत्रपती शिवाजी ब्रिगेडने या निर्णयाचे स्वागत करताना “हा मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा विजय आहे” अशी प्रतिक्रिया दिली.





