पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल १५० हून अधिक नागरिकांची २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी गुप्त तपास करून पाच जणांना अटक केली असून, त्यात एका महिला आरोपीचाही समावेश आहे.
हा घोटाळा एका आयटी अभियंत्याच्या तक्रारीनंतर उघडकीस आला. संबंधित अभियंत्याने ९० लाख रुपये गुंतवले होते आणि त्याच्या खात्यावर ९ कोटी रुपयांचा खोटा नफा दाखवण्यात आला होता. मात्र, पैसे काढण्यासाठी ‘टॅक्स’ आणि ‘शुल्क’ भरण्याची मागणी केल्यानंतर त्याची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
ही टोळी सोशल मीडिया व व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून लोकांना संपर्क साधत होती. कमी वेळेत १०-२० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळले जात होते. नागरिकांनी गुंतवणूक केल्यानंतर एका बनावट ऑनलाइन ट्रेडिंग ॲपवर त्यांचे पैसे वाढत असल्याचे दाखवले जात होते.
सायबर पोलिसांनी या प्रकरणातील डिजिटल पुरावे तपासून आरोपींचा शोध लावला. पोलिसांच्या मते, ही टोळी केवळ या घटनेपुरती मर्यादित नसून, आणखीही अनेकांना त्यांनी गंडा घातला असण्याची शक्यता आहे. सध्या पोलिस आरोपींच्या बँक खात्यांचे, डिजिटल व्यवहारांचे आणि संपर्कांचे सखोल विश्लेषण करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जलद व मोठा परतावा देणाऱ्या ऑनलाईन गुंतवणूक योजनांना बळी पडू नये व कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची त्वरित माहिती सायबर पोलिसांना द्यावी.





