मुंबई – म्हाडाकडून चालू आर्थिक वर्षांत सामान्यांसाठी किती घरे उपलब्ध होतील, याचा आढावा घेतला असून त्यानुसार मुंबईत सामान्यांसाठी 1474 घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. मुंबईत गिरणी कामगारांसाठी चार हजार 215 घरांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी राज्यात साडेअकरा हजार घरे उभारली जाणार आहेत.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जायस्वाल यांनी राज्यात दोन लाख घर निर्मितीचा संकल्प आखला आहे. 2025-26 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार, मुंबईत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 109, अल्प गटासाठी 789, मध्यम गटासाठी 437 आणि उच्च गटासाठी 139 अशा 1474 घरांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय 98 संक्रमण शिबिरेही बांधण्यात येणार आहेत. कोकण गृहनिर्माण मंडळाने या आर्थिक वर्षांत सात हजार 951 घरांच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. यामध्ये अत्यल्प गटासाठी 346 तर अल्प गटासाठी सात हजार 399 आणि मध्यम गटासाठी 206 घरांचा समावेश आहे.
अमरावतीत प्रामुख्याने भूखंड विक्रीवर म्हाडाने भर दिला आहे. त्यानुसार अत्यल्प गटासाठी 95 तर अल्प गटासाठी 154 मध्यम गटासाठी 352 भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. त्या तुलनेत फक्त 54 सदनिकांची निर्मिती केली जाणार आहे. नागपूर गृहनिर्माण मंडळाने अत्यल्प गटासाठी 176, अल्प गटासाठी 200, मध्यम गटासाठी 202 आणि उच्च गटासाठी 43 अशी 621 घरे निर्माण करण्याचे ठरविले आहे. याशिवाय अल्प गटासाठी 424 तर मध्यम गटासाठी 20 भूखंड उपलब्ध करून दिले आहेत.
मार्च अखेर देण्यात आलेल्या सदनिका
मुंबई (दोन लाख 57 हजार 921), कोकण (86 हजार 181), पुणे (56 हजार 991), नागपूर (51 हजार 603), नाशिक (नऊ हजार 622), अमरावती (सात हजार 183), संभाजीनगर (23 हजार 236), याशिवाय इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (36 हजार 600).





