पुणे – सोन्याचे दागिने घालणे हे स्त्रियांनाच शोभून दिसते. पुरुषांनी उगीच त्या भानगडीत पडू नये. अन्यथा गळ्यात सोन्याच्या जाडजूड चेन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. ते चाकण येथील एका ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
आपल्याकडे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सोन्याचे प्रचंड वेड आणि आवड आहे. सुरुवातीपासून आपल्या भागात ही परंपरा चालत आली आहे. पण आधुनिक काळात लोकांचे राहणीमान बदलले आहे. सोने खरेदी करण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी लोक सोन्याच्या दुकानात जाऊन खरेदी करतात. अडचणीच्यावेळी सोनं बँकेत गहाण ठेवता येते, त्यामुळे नड भागवता येते. आपल्या भागात काही लोकांची गोल्डन मॅन म्हणून ओळख आहे. काहींनी सोन्याचे कपडे शिवले होते. पण हे अती होत आहे. माझं पुरुष मंडळींना आणि तरुणांना एवढेच सांगणे आहे की, सोने हे आपल्या मातेच्या, पत्नीच्या, बहिणीच्या आणि मुलीच्या अंगावर शोभून दिसते. पुरुषांच्या अंगावर सोने शोभून दिसत नाही. त्यामुळे पुरुषांनी त्या भानगडीत पडू नका. उगाचच बैलाला आपण गळ्यात साखळी घालतो, तशाप्रकारच्या सोन्याच्या साखळ्या घालून अनेकजण समोर येतात. हे सगळे ते त्यांच्या पैशाने घालतात. पण सोन्याकडे आपण घरातील स्त्रीधन म्हणून बघतो, त्यांना दिले तर जास्त चांगले होईल, असे अजित पवार यांनी म्हटले.
दिवाळीपूर्वी बळीराजाला मदत
सर्व मंत्र्यांनी दौरे केलेत. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उद्ध्वस्त होते, शेतीचे प्रचंड नुकसान होते, जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. पण आम्ही या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्या अनुषंगाने निर्णय घ्यायचे ठरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालेल्या नुकसानीची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे. यासाठी विविध विभागांची मदत लागणार आहे. मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही सांगितले आहे. शेतकऱ्यांना असे काही द्यावे लागणार आहे, जेणेकरून सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असे वाटायला हवे. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे.





