अकलूड – नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूड येथे दांडिया नाईटचे भव्य आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण वातावरण रंगतदार केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य श्री. सचिन बनसोडे यांच्या हस्ते देवीपूजन व पुष्पहार अर्पणाने झाली. त्यानंतर फित कापून दांडिया महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य बनसोडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत आपल्या मनोगतात सांगितले की, “नवरात्रोत्सव हा श्रद्धा, शक्ती आणि एकतेचे प्रतीक आहे. या उत्सवातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, परंपरा व सांस्कृतिक मूल्यांचा बोध होतो.”
यानंतर इयत्ता ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक दांडिया सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर पोदार प्रेपचे लहान विद्यार्थी, शाळेचे शिक्षक आणि पालकांनी देखील मंचावर सुंदर दांडियाचे सादरीकरण केले. संपूर्ण शाळा प्रांगण सुरेल गाणी, तालबद्ध ठेका आणि रंगीबेरंगी परिधानांनी उजळून निघाले.
कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने झालेला हा दांडिया नाईट सर्वांच्या मनात आनंदाची अविस्मरणीय आठवण ठेऊन गेला.





