महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून गरीब महिलांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. या योजनेत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. सुरुवातीला सरकारने काही अटी घातल्या होत्या – जसे की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे, महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असणे आदी.
मात्र अनेक ठिकाणी पात्रतेबाहेरच्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने सरकारने अलीकडेच योजनाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. काही लाभार्थ्यांची नावे वगळली गेल्याने विरोधकांकडून “ही योजना बंद होणार” अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली होती.
हा संभ्रम दूर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात स्पष्ट केले की, “लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, ती सुरूच राहणार आहे.”
यावेळी शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी एका खुर्चीसाठी सर्व काही गमावलं. ते पक्षप्रमुख नसून कटप्रमुख आहेत. फडणवीस यांच्यावर वरून खाली आल्याचा आरोप करतात; पण तुम्ही मात्र घरात बसून वर गेलात. इतका रंग बदलणारा नेता मी पाहिलेला नाही.”





