मुंबई – विधानभवन परिसरात घडलेल्या मारहाण प्रकरणाच्या पुढील तपासाला स्थगिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मरीन लाइन्स पोलिसांना दिले आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्या. चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने बुधवारी ही स्थगिती दिली. पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
देशमुख यांचे वकील राहुल आरोटे यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय प्रेरणेने केला गेला असून, पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.
ही घटना १७ जुलै रोजी विधानभवनात घडली होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाली होती. या प्रकरणी दोन्ही बाजूंवरील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना जामिनावर सोडले.





