यावल – न्हावी प्रभाग यावल येथे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी (डीसीएस) अॅपमधील चुकीच्या नकाशामुळे पीक पेरा नोंदवताना मोठ्या अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांनी नगर भूमापक अधिकारी यावल यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून सातबारावर पीक पेरा नोंदणीसाठी ई-पीक अॅप वापरला जात आहे. मात्र, यावर्षी अॅपमध्ये जीपीएस आधारित नकाशा चुकीचा असल्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी प्रत्यक्ष गटाच्या ठिकाणी जाणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, गट क्रमांक ५२८ च्या शेतकऱ्यांना नकाशा चुकीचा असल्यामुळे ४८२५ मीटर दूरच्या ठिकाणी जावे लागते, जिथे त्यांच्या पीकाची नोंद करता येत नाही.
या चुकीमुळे शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे, तसेच शासनाच्या शेतीविषयक योजनांचा लाभ घेणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी फैजपूर आणि तहसीलदार यावल यांना निवेदन देऊन अॅपमधील जुना सर्वे नकाशा काढून, नवीन गट नकाशा लावण्याची किंवा नकाशा न ठेवण्याची विनंती केली आहे.





