यावल – यावल तालुक्यातील कोरपावली येथे रविवारी मुस्लिम पटेल समाजात एक अनोखा आणि आदर्श ठरणारा विवाह सोहळा पार पडला. पारंपरिक खर्च, दिमाख आणि मोठ्या समारंभांना फाटा देत साखरपुड्याच्याच कार्यक्रमात छोटेखानी निकाह संपन्न करण्यात आला.
दरवर्षी विवाह सोहळ्यांमध्ये होणारा अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि औपचारिकतेला दूर ठेवून साधेपणाने विवाह करावा, असा विचार वधू-वर पक्षाने मांडला. या संकल्पनेस दोन्ही कुटुंबांनी उत्साहाने सहमती दर्शवली आणि त्याच साखरपुड्याच्या प्रसंगी निकाह लावून विवाह पार पडला.
यावल शहरातील रहिवासी दानिश सईद पटेल आणि सानिया तालेब पटेल यांचा साखरपुडा रविवारी कोरपावली येथे पार पडला. हाजी मुक्तार इसा पटेल यांच्या सूचनेनुसार, साखरपुड्याच्याच कार्यक्रमात निकाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमास दोन्ही कुटुंबीयांनी आणि गावातील समाजबांधवांनी मोठा पाठिंबा दिला.
कोणताही हळदी समारंभ, वरात किंवा खर्चिक कार्यक्रम न करता अगदी साधेपणात विवाह पार पडला. या निर्णयातून समाजाला एक सुंदर संदेश मिळाला — “विवाहासाठी मोठ्या खर्चाची नव्हे, तर मनाची तयारी आणि परस्पर संमती पुरेशी असते.”
कार्यक्रमाला अजित गनी पटेल, नसिर गनी पटेल, सादिक गनी पटेल, वसीम सिकंदर पटेल, रमीज सिकंदर पटेल, न्याजुद्दीन हैदर पटेल, हाजी समद चांद पटेल, शरीफ इसा पटेल, इकबाल इसा पटेल, आबुतालेब अफजल पटेल, मुक्तार पिरन पटेल, रशिद नबाब पटेल, आसिक मोहमंद पटेल, मुनाफ रहेमान पटेल, महंमद पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
या छोटेखानी विवाह सोहळ्याने केवळ दोन कुटुंबांचे बंधन नव्हे तर संपूर्ण मुस्लिम पटेल समाजासमोर साधेपणाचा एक अनुकरणीय आदर्श प्रस्थापित केला आहे.





