नाशिक – लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून, बहिणींच्या तक्रारींसाठी शिवसेनेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नाशिकमधील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले.
शिवसेना (शिंदे गट) तर्फे नाशिकमध्ये बूथप्रमुख कार्यशाळा आणि प्रमुख पदाधिकारी बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बूथप्रमुखांना मार्गदर्शन केले व निवडणूक तयारीसंदर्भात विविध सूचना दिल्या.
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, तसेच उपनेते अजय बोरस्ते उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, “राज्याच्या विकासासाठी जनतेने महायुतीवर निर्विवाद विश्वास दाखवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा विजय निश्चित आहे.”
ते पुढे म्हणाले, “राज्यात लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. कोणत्याही भगिनींवर अन्याय होऊ नये, यासाठी शिवसेनेने राज्यस्तरीय तक्रार निवारण मंच स्थापन केला आहे. नाशिकसह राज्यातील अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचे काम शिवसेना करणार आहे.”
शिंदे यांनी पुढे सांगितले की, स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा बिगुल वाजला असून, कोणत्याही परिस्थितीत नाशिकसह राज्यात महायुतीचाच भगवा फडकणार आहे.
पालकमंत्रीपदाचा विषय ट्रम्प यांच्याकडे द्यावा!
नाशिकच्या पालकमंत्री पदावरून झालेल्या चर्चेचे पडसाद या मेळाव्यातही उमटले. यावेळी मंत्री दादा भुसे विनोदी पद्धतीने म्हणाले,
“नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सातत्याने प्रयत्न करूनही हा प्रश्न सुटलेला नाही.”
या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. मात्र या निमित्ताने भुसे यांच्या मनातील पालकमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा प्रकट झाली.





