सोलापूर – प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर सोलापूर दौऱ्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी बोलेरो जीपमधून येऊन पिस्तुल आणि धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ला केला. पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे चारही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
राणा सूर्यवंशी हे व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि सामाजिक कार्यामुळेच हा हल्ला घडवून आणला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घटना अशी की, सूर्यवंशी हे कामानिमित्त सोलापूर दौऱ्यावर आले होते. अलीकडेच त्यांनी खरेदी केलेल्या साखर कारखान्याच्या कामानिमित्त ते अक्कलकोट येथे गेले होते. परतताना त्यांच्या गाडीवर बोलेरो वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक पिस्तुल आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
या प्रकरणी पोलिसांनी सचिन लाळू राठोड (मुळेगाव तांडा), आकाश मधुकर चव्हाण आणि कृष्ण फुलचंद पवार (वाज्जी कालवा तांडा) तसेच अविनाश शिवाजी राठोड (बक्षी हिप्परगा तांडा) या चौघांना अटक केली आहे.
या कारवाईत विशेष आयजीपी सुनील फुलारी आणि सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
गडचिरोलीसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून राणा सूर्यवंशी यांनी समाजात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या हल्ल्यानंतर व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.





