यावल प्रतिनिधी – यावल तालुक्यातील वड्री–परसाडे–सातोद हा प्रमुख मार्ग अक्षरशः खड्ड्यांनी व्यापला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, प्रवास करणे म्हणजे आता जीवावरचा खेळ ठरत आहे.
या मार्गावरून दररोज गर्भवती महिला, आजारी रुग्ण, शाळकरी मुले आणि शेतकरी प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील खोल खड्डे आणि उखडलेले डांबर यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका नागरिकाने सांगितले,
”गर्भवती महिलेला दवाखान्यात नेताना गाडीतील जोरदार धक्क्यांमुळे तिच्या आणि पोटातील बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो.”
पावसाळ्यानंतर या रस्त्याची अवस्था आणखी गंभीर झाली आहे. आजूबाजूच्या गावांचे रस्ते चांगले झाले असतानाही तालुक्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खड्डेमय अवस्थेत आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढला आहे.
नागरिकांचा इशारा –
“रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी तातडीने लक्ष घालावे; अन्यथा मोठ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,”
असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.





