नवी मुंबई – दि. 23 ऑक्टोबर 2025 भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप 2025 च्या सेमीफायनलमध्ये दमदार प्रवेश केला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या “करो या मरो” सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला.
या विजयासह भारताने वर्ल्ड कपमधील आपली मोहिम जिवंत ठेवली असून, ट्रॉफीपासून आता केवळ दोन सामने दूर आहे.
ओपनिंग जोडीचा तडाखा
भारताच्या विजयाचा पाया प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांच्या जबरदस्त ओपनिंग पार्टनरशिपने रचला. दोघींनी मिळून तब्बल २१२ धावांची भागीदारी केली.
प्रतिकाने १३४ चेंडूत १२२ धावा, तर स्मृतीने ९५ चेंडूत १०९ धावा करत शानदार शतक झळकावले. दोघींनी मिळून २३ चौकार आणि ६ षटकार लगावले, ज्यामुळे भारताने सुरुवातीपासूनच भक्कम पकड मिळवली.
जेमिमा रोड्रिग्जचा शानदार पुनरागमन
या वर्ल्ड कपमध्ये फॉर्ममध्ये नसलेली जेमिमा रोड्रिग्ज न्यूझीलंडविरुद्ध चमकली. तिने ५५ चेंडूंमध्ये नाबाद ७६ धावा करत कमबॅकची घोषणा केली. तिच्या ११ चौकारांच्या खेळीने संघाचा धावफलक भक्कम केला.
रेणुका सिंहकडून निर्णायक झटका
न्यूझीलंडच्या कर्णधार सोफी डिवाइन ही भारतासाठी मोठा धोका होती. ती या स्पर्धेत ६६.५० सरासरीने खेळत होती. परंतु रेणुका सिंहने फक्त ६ धावांवर तिला बाद करत न्यूझीलंडचा मुख्य आधारच डळमळीत केला.
भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा
रेणुका सिंह आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर स्नेह राणा, श्री चरणी, दीप्ती शर्मा आणि प्रतिका रावल यांनी प्रत्येकी १ विकेट घेत न्यूझीलंडला ८ बाद २७१ धावांवर रोखले.
DLS पद्धतीचा भारताला लाभ
पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला असला तरी DLS पद्धतीनुसार भारताला लाभ झाला. भारताने ४९ षटकांत ३ विकेट्स गमावून ३४० धावा केल्या होत्या. न्यूझीलंडसमोर ४४ षटकांत ३२५ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. परंतु त्या संघाने फक्त २७१ धावांपर्यंत मजल मारली.
आता ट्रॉफीपासून फक्त दोन पावलं दूर
भारताचा बांगलादेशविरुद्ध एक सामना अद्याप बाकी आहे, मात्र त्या निकालानंतरही भारत चौथ्या स्थानावर राहील. सेमीफायनल आणि अंतिम सामना जिंकूनच भारताला वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवता येईल. सध्याच्या फॉर्मनुसार टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.





