वॉशिंग्टन (वृत्तसंस्था): पृथ्वीवर लवकरच एलियनचा हल्ला होण्याची शक्यता असल्याचा धक्कादायक दावा हार्वर्ड विद्यापीठातील प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर एव्ही लोएब यांनी केला आहे. त्यांनी इशारा दिला आहे की २९ ऑक्टोबरपूर्वी लोकांनी सुट्ट्या घ्याव्यात, कारण त्यानंतर काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही.
‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, जुलैपासून मॅनहॅटनच्या आकाराची एक गूढ वस्तू अंतराळ संशोधकांच्या नजरेत आली आहे. ती अत्यंत वेगाने फिरत असून एलियन तंत्रज्ञानाचे जहाज असू शकते, असा लोएब यांचा अंदाज आहे.
या वस्तूला “3/ATLAS” असे नाव देण्यात आले असून ती १ जुलै रोजी प्रथमच दिसली होती. काही शास्त्रज्ञ ती धूमकेतू असल्याचे सांगत असले तरी, लोएब यांच्या मते ती इंटरस्टेलर वस्तू, म्हणजेच एलियनचे अंतराळयान असू शकते — जे मानवजातीला “वाचवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी” येत आहे.
त्यांच्या अंदाजानुसार, ही वस्तू २९ ऑक्टोबर रोजी सूर्याच्या सर्वाधिक जवळ येणार असून त्या वेळी पृथ्वीवर अचानक हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोएब यांनी लोकांना “सुट्टी घ्या आणि जीवनाचा आनंद घ्या, कारण त्यानंतर काय होईल हे निश्चित सांगता येत नाही,” असा सल्ला दिला आहे.
शास्त्रज्ञांच्या गणनानुसार, हे तथाकथित अंतराळयान २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. ती सुमारे ३३ अब्ज टन वजनाची असून मागील कोणत्याही ताऱ्यांजवळून गेलेल्या वस्तूपेक्षा दुप्पट वेगाने फिरत आहे. संशोधकांनी आढळवले आहे की या वस्तूतून प्रति सेकंद चार ग्रॅम निकेल बाहेर पडत आहे.
लोएब यांच्या संशोधनानुसार, या धातूमध्ये निकेल टेट्राकार्बोनिल नावाचे मिश्रण सापडले आहे, जे नैसर्गिकरित्या धूमकेतूंमध्ये कधीही आढळलेले नाही. त्यामुळे त्यांनी निष्कर्ष काढला की ही वस्तू कृत्रिम असून एलियन तंत्रज्ञानाची निर्मिती असू शकते.
‘न्यू यॉर्क पोस्ट’शी बोलताना लोएब म्हणाले, “या घटनेचे परिणाम आपण फक्त कल्पना करू शकतो. जर ही वस्तू खरोखर एलियन जहाज असेल, तर ते पृथ्वीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते.”
या दाव्यामुळे वैज्ञानिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मात्र काही तज्ज्ञांनी हा दावा अतिरंजित आणि कल्पनारम्य असल्याचे सांगत एलियन हल्ल्याची शक्यता फेटाळली आहे.





