पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाचा फुरसूंगी पोलिसांनी तब्बल महिनाभर चाललेल्या विशेष मोहिमेनंतर अखेर शोध लावला आहे. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यानंतर पुणे–हैदराबाद तसेच हैदराबाद–उत्तरप्रदेशपर्यंत पोलिसांनी शोधमोहीम राबवून मुलीची सुरक्षित सुटका केली.
या प्रकरणी रमेश मसनाजी पिट्टलवाड (२५, रा. धगनगर वस्ती उरूळी देवाची, मुळ नांदेड) आणि त्याची सावत्र आई मुक्ताबाई मसनाजी पिट्टलवाड (३५, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नानासाहेब जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
रमेश हा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून कामानिमित्त पुण्यात राहत होता. त्याची एका १३ वर्षीय मुलीसोबत ओळख झाली होती. ही ओळख वाढवत त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले आणि तिचे अपहरण केले. या गुन्ह्यात त्याची सावत्र आईही सहभागी होती. तिने रमेशला “हैदराबादला माझे नातेवाईक आहेत” असे सांगून तेथे जाण्यास सांगितले आणि खर्चासाठी पैसेही दिले.
दोघे रेल्वेने हैदराबादला रवाना झाल्यानंतर मुलगी गायब झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबाने फुरसूंगी पोलिसांत नोंदवली. तपासादरम्यान रमेश हैदराबादमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु, पोलिस पोहोचण्यापूर्वीच तो मुलीसह तेथून पसार झाला. सावत्र आईची चौकशी केल्यानंतरही तो सापडत नव्हता.
तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज आणि बातमीदारांच्या मदतीने रमेश आणि मुलगी उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बामणौली गावात असल्याचे समोर आले. त्यानंतर पथक उत्तरप्रदेशात रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने चार दिवस शोधमोहीम राबवून अखेर रमेशला पकडण्यात पोलिसांना यश आले. अपह्रत मुलगीही सुरक्षित सापडली. रमेश आपल्या मावशी–काकाकडे लपून बसला होता.
१८ ऑक्टोबर रोजी मुलीला घेऊन पळालेल्या रमेशला अखेर महिनाभराच्या तपासानंतर अटक करण्यात आली असून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.





