मुंबई : काही दिवस गायब झालेल्या थंडीने पुन्हा जोर धरला असून आगामी आठवडाभर राज्यात गारव्याची लाट कायम राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
मुंबईसह कोकणातही याचा प्रभाव जाणवत असून सलग दुसऱ्या दिवशी सांताक्रूझ येथे किमान तापमानाचा पारा खाली आला. सोमवारी सांताक्रूझ येथे १६.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. कुलाबा येथे मात्र तापमान अद्याप २० अंशांखाली उतरलेले नाही.
शनिवारी मुंबईत या मोसमातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली होती.
अहिल्यानगर सर्वात थंड; अनेक ठिकाणी पारा १० अंशांखाली
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातही सोमवारी तापमानात मोठी घसरण दिसून आली. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे ९.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
इतर तापमान असा होता:
जळगाव : १०.८°C, मालेगाव : १०.४°C, नाशिक : १०°C, पुणे : १०°C, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानातही घट झाली असून अहिल्यानगर येथे २७.९°C, तर जळगाव येथे २८.७°C कमाल तापमान नोंदले गेले.
मराठवाडा–विदर्भातही थंडीचा प्रभाव
मराठवाडा आणि विदर्भात सरासरी किमान तापमानापेक्षा पारा स्पष्टपणे कमी नोंदला गेला.
बीड येथे किमान तापमान १०.३°C, म्हणजे सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी कमी होते. यवतमाळ येथे किमान तापमान १०.८°C नोंदले गेले. कोकणात कमाल तापमान अजूनही ३० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची प्रतीक्षा आहे.





