यावल – ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असले तरी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा मनवेल परिसरात मात्र अपुरी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. यावल आगारातून ग्रामीण भागात धावणाऱ्या अनेक जुन्या एसटी बसेस वारंवार बंद पडत असल्याने विशेषतः मनवेल आणि थोरगव्हाण–शिरागड मार्गावरील प्रवाशांचा प्रवास विस्कळीत होत आहे. या परिस्थितीकडे महामंडळ गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न संतप्त प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून यावल आगारातील बसेस मधेच अडकल्याने शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. अत्यंत जीर्ण आणि खिळखिळ्या अवस्थेतल्या बसेस अजूनही रस्त्यावर चालवल्या जात असल्यामुळे त्या बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत.
स्टेअरिंगमधील बिघाड, गिअर अडकणे, रेडिएटर फुटणे, इंजिन ओव्हरहिट होणे, टायर फुटणे, स्टार्टर निकामी होणे, फॅन बेल्ट तुटणे असे तांत्रिक त्रास आता नेहमीचे झाले आहेत. बसचे आतील भागही खराब स्थितीत असून सीट तुटलेल्या, गाद्या फाटलेल्या, खिडक्या तुटलेल्या किंवा नसलेल्या, पत्रे सैल झालेली आणि अतोनात आवाज करणारी असे प्रकार प्रवाशांना रोज सहन करावे लागत आहेत.
सोमवारी यावल आगारातून सुटलेली शिरागड बस गावात पोहोचताच बंद पडली. तर मंगळवारी सकाळी सातची बस साकळी गावाजवळ बिघाडामुळे थांबली. दोन्ही बसांमध्ये तांत्रिक दोष असल्यामुळे प्रवाशांना अन्य वाहनांची मदत घेऊन पुढील प्रवास करावा लागला. अशी परिस्थिती रोजच्या रोज असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. वेळेवर प्रवास न झाल्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, पण मानसिक त्रासही सहन करावा लागतो.
महिलांसाठी अर्ध्या तिकीटाची तर ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सुविधा सुरू केल्यापासून प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, यावल आगारातून सुटणाऱ्या बस प्रत्यक्षात सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करणे अत्यंत गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नादुरुस्त बसमुळे प्रवाशांसह चालक आणि वाहकांनाही प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.





