जळगाव – जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. रात्रीपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्याची मतदानाची सरासरी ६५.५६ टक्के इतकी नोंदली गेली.
या निवडणुकीत जिल्ह्यातील १६ नगरपालिका आणि २ नगरपंचायती मिळून एकूण ४५२ जागांसाठी तब्बल १५६४ उमेदवार रिंगणात होते. २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले असून अनेक ठिकाणी रात्री ९ वाजेपर्यंतही मतदारांच्या रांगा कायम होत्या.
जिल्हा प्रशासनाच्या मते, जिल्ह्यातील ८,८१,५१० मतदारांपैकी ५,७७,८८१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २,९८,६५३ पुरुष तर २,७९,२२८ महिला मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक मतदान एरंडोलमध्ये ७५.४९ टक्के, तर सर्वात कमी मतदान भुसावळमध्ये ५४.९१ टक्के नोंदले गेले.
भुसावळमध्येच सर्वात कमी मतदान — मंत्र्यांच्या ‘बालेकिल्ल्यात’ पडला फटका
मंत्र्यांच्या उपस्थिती आणि प्रयत्नांनंतरही भाजपला काही ठिकाणी मतदानाचा टक्का वाढवण्यात अपयश आल्याचे चित्र दिसले. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मतदारसंघातील भुसावळ येथेच जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान झाले. विशेष म्हणजे, या नगरपरिषदेच्या निवडणुकीत सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.
तसेच भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये मतदानाचा टक्का ६०.६८, तर जळगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगाव शहरात केवळ ६२.५८ टक्के मतदान झाले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगरमध्येही फक्त ६४.४४ टक्के मतदानाची नोंद झाली.
नगरनिहाय मतदानाचा तपशील (जळगाव जिल्हा)
एरंडोल : ७५.४९%, रावेर : ७४.७४%, यावल : ७३.१६% फैजपूर : ७२.९१%, पारोळा : ७२.८७%, वरणगाव : ७२.७१% धरणगाव : ७२.५४%, शेंदुर्णी : ६९.८९%, सावदा : ६९.९९%, पाचोरा : ६८.८२%, भडगाव : ६८.७०%, नशिराबाद : ६८.११%, चोपडा : ६७.९७%, अमळनेर : ६४.४८%, मुक्ताईनगर : ६४.४४%, चाळीसगाव : ६२.५८%, जामनेर : ६०.६८%, भुसावळ : ५४.९१% (सर्वात कमी)





