जामनेर ग्रामीण (जळगाव) – येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहून तिने बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
अल्पवयीन मुलगी प्रसुतीसाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसुतीनंतर तिचे वय केवळ 17 असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तालुका पोलिसांना माहिती दिली.
पोलिस चौकशीत उघड झाले की मुलीचा 15 मार्च 2024 रोजी चोपडा तालुक्यातील एका तरुणाशी विवाह लावण्यात आला होता. कायद्यानुसार मुलीचे किमान वय 18 वर्ष असणे बंधनकारक असताना हा बालविवाह करण्यात आला होता.
या गंभीर प्रकरणात पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत 8 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल केला. मुलीचा पती, सासू-सासरे, आई-वडील, मामा तसेच लग्नात सामील असलेले नातेवाईक अशा एकूण 10 जणांवर विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुलीच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.





