जळगाव : जिल्ह्यातील बिलवाडी गावात दहा वर्षांपूर्वीच्या वैमनस्यातून पुन्हा पेटलेल्या वादाने रक्तरंजित स्वरूप धारण केले. रविवारी दुपारी झालेल्या हाणामारीत एकनाथ निंबा गोपाळ (वय 55) यांचा मृत्यू झाला असून दोन्ही कुटुंबांतील 11 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
शनिवारी रात्री सुरू झालेल्या किरकोळ वादानंतर रविवारी दुपारी ग्रामपंचायतीच्या बांधकामस्थळी गोपाळ व पाटील कुटुंबांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर दगड, लाकडी दांडे आणि बांधकाम साहित्य वापरून झालेल्या हाणामारीत झाले. यात एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला, तर दोन्ही गटांतील ११ जण जखमी झाले.
घटनेनंतर मृताचा ताबा घेण्यास नकार देत संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.