मुंबई – गेल्या काही दिवसांपासून उघडलेला पाऊस कालपासून पुन्हा राज्यात सक्रिय झाला असून अनेक भागांत मुसळधार सरी बरसत आहेत. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी रिमझिमसह जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे गणपती विसर्जनानंतर उन्हाचा चटका बसायला लागलेले मुंबईकर पुन्हा पावसाने हैराण झाले आहेत.
दरम्यान बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी नवरात्र, दसरा आणि दिवाळीपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना पावसाचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
अलर्ट जारी :
-
ऑरेंज अलर्ट – रायगड, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर घाटमाथा
-
यलो अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक घाटमाथा, अहमदनगर, सातारा घाटमाथा, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी आणि अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.