छत्रपती संभाजीनगर : जालना वरून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरचा ताबा सुटल्याने अजिंठा घाटातील फर्दापूरजवळ सोमवारी रात्री (९ वाजता) भीषण अपघात झाला. या अपघातात जळगावच्या मिताली सुहास पाटील (६०) यांचा जागीच मृत्यू झाला असून सुहास पाटील (६५) आणि चालक योगेश नारायण ओसवाल (४९) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटील दाम्पत्य कारने (क्र. MH-03-AW-2261) जळगावकडे जात असताना लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ओव्हरलोड ट्रेलरने (क्र. MH-21-BN-4916) त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार ट्रकखाली दबल्याने वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.
नागरिकांनी तत्काळ जखमींना बाहेर काढून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मिताली पाटील यांना मृत घोषित केले. तर सुहास पाटील आणि योगेश ओसवाल यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे रस्त्यावर मोठा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.