नाशिक : कांद्याला भाव नाही, शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत केवळ होर्डिंगबाजी करून चालणार नाही, शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांना मदत करा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
“शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना सोन्याची नाणी देऊन शेती सुरू ठेवण्यास मदत केली होती. आज तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता, पण बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही,” असा थेट हल्लाबोल पवारांनी केला.
नाशिकमध्ये सोमवारी (दि. १५) झालेल्या ‘बळीराजाचा आक्रोश मोर्चा’त पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला. कर्जमाफी, पिकाला हमीभाव, ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
“आगामी दिवसांत मदत मिळाली नाही तर नाशिकचा हा मोर्चा अधिक उग्र होईल,” असा इशारा देतानाच पवारांनी राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. “नेपाळमध्ये सरकार पडलं आणि भगिनीच्या हातात सत्ता आली. आणखी काही सांगणार नाही,” असे संकेत पवारांनी दिले.