जळगाव | शहरात अल्पवयीन मुलीला कामाचे आमिष दाखवून वाममार्गाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पती-पत्नींसह एका तरुणीविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात बलात्कार, पोक्सो व पीटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान कोल्हे नगर परिसरात हा प्रकार घडला. घरातील वादामुळे अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली होती. त्यानंतर शहरातील एका तरुणाने तिला “माझ्या मैत्रिणीकडे काम कर, तुला चांगले पैसे मिळतील” असे सांगून सतीश ऊर्फ मनोज पाटील व सरला पाटील (रा. कोल्हे नगर) यांच्याशी तिची ओळख करून दिली.
या काळात अल्पवयीन मुलीचा गैरवापर झाला असून ती गर्भवती असल्याचे रुग्णालयात तपासणीदरम्यान स्पष्ट झाले. जिल्हा पेठ पोलिसांनी तिला शोधून काढून सुरुवातीला बालसुधारगृह व नंतर आशादीप वसतिगृहात दाखल केले होते. १३ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.





