पाचोरा : अजिंठा पर्वतरांगांवर १५ सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या ढगफुटीमुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान सातगाव (डोंगरी) परिसरात पाणी घुसले आणि गाव पाण्याने वेढले गेले.
पुरामुळे सव्वाशे ते दीडशे घरांमध्ये पाणी शिरले. कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकांचे संसार उध्वस्त झाले. घरातील साहित्य, जीवनावश्यक वस्तू, कोंबड्या व इतर जनावरे वाहून गेली. तर काही घरांमध्ये पाणी गुडघ्यापासून कमरेपर्यंत साचल्याने मोठे नुकसान झाले. परिसरातील शेती मालही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेनंतर आमदार किशोर पाटील, माजी जि.प. सदस्य मधुकर काटे व तहसीलदार विजय बनसोडे यांनी गावाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा करून प्रत्येक बाधित घरमालकाला तातडीने एक लाख रुपयांचे अनुदान देण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. तसेच एक महिनाभर धान्य व किराणा पुरवठ्याचे आश्वासनही त्यांनी दिले.