यावल : यावल तालुक्यातील विविध भागांत काही वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर “महाराष्ट्र शासन, पोलीस, रेल्वे, फॉरेस्ट, ग्रामसेवक, शिक्षक” अशा शासकीय विभागांच्या व पदनावांच्या पाट्या लावून खुलेआम दादागिरी सुरू केली आहे. अशा गाड्या सर्रास रस्त्यावरून धावत असून, सामान्य नागरिकांवर दडपण आणण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कायद्यानुसार, कोणत्याही खासगी व्यक्तीस शासकीय विभागाचे नाव वा पदनाव वापरून वाहनावर पाटी लावण्याचा अधिकार नाही. हा प्रकार थेट गुन्ह्याच्या स्वरूपाचा असून संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, पोलीस प्रशासन व वाहतूक शाखा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने जनतेत संताप पसरला आहे.
नागरिकांचा सवाल आहे की –
“वाहतूक निरीक्षक आणि पोलीस प्रशासन गाढ झोपेत आहे का? कायद्याचा उघडपणे भंग करूनही कारवाई का होत नाही?”
यावल तालुक्यातील जनतेने मागणी केली आहे की, तातडीने अशा वाहनांवरील बेकायदेशीर पाट्या जप्त करून वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अन्यथा नागरिकांना एकत्र येऊन कठोर आंदोलन उभारण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.