जामनेर : तालुक्यातील नेरी, चिंचखेडा यांसह विविध गावांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज नेरी, चिंचखेडा गावांना भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. पिके व शेती मातीसह वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
या परिस्थितीकडे गंभीरतेने पाहत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निसर्गाच्या या संकटाच्या काळात राज्य सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, सा.बां.विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. प्रशांत सोनवणे, तहसिलदार श्री. नानासाहेब आगळे, जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.