नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) केलेल्या कपातीमुळे ग्राहकांनी खरेदी लांबणीवर टाकली आहे. परिणामी कंपन्यांकडून डिलरला होणारा कारचा पुरवठा ऑगस्ट महिन्यात 9 टक्क्यांनी घटून 3 लाख 21 हजार 840 वर आला आहे.
गतवर्षी ऑगस्ट महिन्यात 3 लाख 52 हजार 921 कार डिलरकडे दाखल झाल्या होत्या. जीएसटीत कपात झाल्याने अनेक ग्राहकांनी खरेदी लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील कारची मागणी घटल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सचे (एसआयएएम) महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले. जीएसटी कपातीमुळे 1200 सीसीपर्यंतच्या पेट्रोल आणि दीड हजार सीसीपर्यंतच्या डिझेल वाहनावरील कर 28 वरून 18 टक्क्यांवर आला आहे. तर, त्यावरील वाहनांवर 40 टक्के कर आकारला जाणार आहे.
कंपन्यांकडून डिलरला होणारा दुचाकींचा पुरवठा सात टक्क्यांनी वाढून 18 लाख 33 हजार 921 वर गेला आहे. गतवर्षी याच कालावधीत 17 लाख 11 हजार 662 दुचाकींचा पुरवठा झाला होता. त्यात स्कूटरचा पुरवठा 13 टक्क्यांनी वाढून 6 लाख 83 हजार 397 आणि मोटरसायकलींचा पुरवठा 4 टक्क्यांनी वाढून 11 लाख 6 हजार 638 वर गेला आहे. तीनचाकी वाहनांचा पुरवठा आठ टक्क्यांनी वाढून 75 हजार 759 झाला आहे. ऑगस्ट-2024 मध्ये 69 हजार 962 वाहनांचा पुरवठा झाला होता.