मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आज (१७ सप्टेंबर) रोजीही राज्यातील १९ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने (IMD) दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई व कोकणात मुसळधार
मुंबईत आज ढगाळ वातावरण राहून काही भागांत जोरदार सरी कोसळतील. कमाल तापमान २९ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सियस इतके राहण्याचा अंदाज आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूरला अलर्ट नसला तरी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे.
मराठवाडा
या विभागातील सर्व आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासोबतच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र व विदर्भ
नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथे मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.
विदर्भात अमरावती, नागपूर आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आला असून, उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी पडतील.
पावसामागचे कारण
हवामान खात्यानुसार विदर्भ-तेलंगणा सीमेवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने पूरप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.





