कोल्हापूर : निसर्गाचा अद्भुत चमत्कार मानावी अशी घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. बानगे गावातील शेतकरी सुरेश यशवंत सुतार यांच्या म्हशीने मंगळवारी दोन तोंडी रेडकाला जन्म दिला. या अजब जन्मामुळे परिसरात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
सुरुवातीला सर्वसामान्य वाटणाऱ्या रेडक्याला दोन डोकी व दोन तोंड असल्याचे लक्षात आल्यानंतर उपस्थित सर्वजण अवाक झाले. चार पायांसह शरीर एकच असले, तरी दोन डोकी असल्याने हे दृश्य पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली. या रेडक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे.
पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशी घटना अतिशय दुर्मिळ असून ती जनुकीय दोषामुळे होते. गर्भधारणेदरम्यान असामान्य पेशी विभाजनामुळे अशा प्रकारचे विकार आढळतात. अशा रेडक्याचे दीर्घकाळ जगणे कठीण असते. दुर्दैवाने, जन्मल्यानंतर केवळ चार तासांत या दुर्मिळ रेडक्याचा मृत्यू झाला.