सोशल मीडियावर सध्या AI फोटोंचा ट्रेंड जोरात आहे, विशेषतः महिलांमध्ये. गुगल जेमिनीसारख्या टूल्सच्या मदतीने अनेक जणी स्वतःचे साडीतील फोटो तयार करून शेअर करत आहेत. अगदी बॉलिवूड अभिनेत्रीही या ट्रेंडमध्ये सहभागी होताना दिसतात.
हा ट्रेंड पाहता मजेशीर वाटतो; एक फोटो द्या, हवे तसे निर्देश द्या आणि काही मिनिटांतच हवा तसा फोटो तयार होतो. मात्र एका तरुणीने शेअर केलेल्या अनुभवामुळे या ट्रेंडची सुरक्षितता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
इन्स्टाग्रामवरील jhalakbhawnani या पेजवर शेअर झालेल्या व्हिडीओत तरुणीने सांगितले की, AI ने तयार केलेल्या फोटोंमध्ये तिच्या हातावर तीळ दिसत होता. विशेष म्हणजे तिने AI ला दिलेल्या मूळ फोटोत तिने फुल-स्लीव्ह्स कपडे घातले होते. मग AI ला तिच्या हातावरील तीळाची माहिती मिळाली तरी कशी? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
हा व्हिडीओ तब्बल ९४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून नेटकरीही यामुळे थक्क झाले आहेत. काहींनी AI धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले, तर काहींनी हे केवळ योगायोग असल्याचे म्हटले.
तज्ज्ञांच्या मते, आपण सतत गुगलशी जोडलेले असल्यामुळे त्याच्याकडे आपले अनेक फोटो आणि माहिती असू शकते. कदाचित त्या आधारावरच AI ने फोटोमध्ये तीळ दाखवला असावा. यामुळे AI फोटोंची सुरक्षितता हा चर्चेचा विषय बनला आहे.