मुंबई : F&O ट्रेडिंग नेहमीच उच्च जोखमीचे मानले जाते आणि एक चूकही कोट्यवधींचे नुकसान घडवू शकते. अशीच एक धक्कादायक घटना बेंगळुरूस्थित प्रसिद्ध रिअल मनी गेमिंग कंपनी Gameskraft Technologies मध्ये उघडकीस आली आहे.
कंपनीचे माजी ग्रुप CFO रमेश प्रभू यांनी तब्बल 3-4 वर्षांपासून कंपनीचे निधी Futures & Options ट्रेडिंगमध्ये गुंतवून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. या धोकादायक निर्णयामुळे कंपनीला तब्बल 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका बसला आहे.
प्रभू यांनीच 5 मार्च रोजी ई-मेलद्वारे गैरव्यवहार कबूल केला. त्यांनी स्पष्ट केले की या घोटाळ्यात इतर कोणी सहभागी नव्हते. कंपनीच्या तपासात 231 कोटींचे अनधिकृत व्यवहार झाल्याचे आढळले.
FIR मधील आरोप
कंपनीच्या तक्रारीवरून बेंगळुरू पोलिसांनी प्रभू यांच्यावर चोरी, फसवणूक, बनावटगिरी, विश्वासघात आणि खात्यात फेरफार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. प्रभू यांनी कंपनीच्या बँक खात्यातून निधी स्वतःच्या खात्यात वळवून बनावट म्युच्युअल फंड स्टेटमेंट तयार केले होते. या कारणामुळे कंपनीने FY25 च्या खात्यांतून तब्बल 270 कोटींचे राइट-ऑफ केले.
गेमिंग इंडस्ट्रीवरील परिणाम
दरम्यान, ऑनलाइन रिअल मनी गेम्सवर बंदी घालणारा नवीन कायदा लागू झाल्यानंतर Gameskraft ने आपले रमी ॲप आणि पोकर प्लॅटफॉर्म Pocket52 बंद केले आहेत. कंपनीने स्पष्ट केले की ते आता कायदेशीर लढाई लढणार नाहीत आणि बदलत्या कायद्यांनुसार नवे डिजिटल गेमिंग सोल्युशन्स शोधणार आहेत.