रावेर – रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथे ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराविरोधात महिलांनी संतप्त आंदोलन उभारले. जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील मध्यवर्ती भागातील गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची वाईट अवस्था असून पेव्हर ब्लॉक, गटारी व इतर नागरी सोयीसुविधांचा अभाव आहे.
रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून अखेर आज सकाळी महिलांनीच पुढाकार घेत रस्त्याला पत्र्यांचे कुंपण घालून पूर्णपणे बंद केला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात घोषणा देत महिलांनी ठाम भूमिका घेतली की, “रस्त्याचे काम मार्गी लागत नाही तोवर आम्ही रस्ता बंदच ठेवू.”
ग्रामस्थांची प्रतिक्रिया :
1. वंदनाबाई पाटील व सुनंदाबाई भंगाळे, ग्रामस्थ :
“आमचा रस्ता पूर्ण होत नाही तोवर आम्ही रस्ता बंद ठेवू. चालणेही जिगरीचे झाले आहे. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी.”
2. संगीता भास्कर पाटील, लोकनियुक्त सरपंच, खिर्डी बु
“या रस्त्याचे काँक्रीटीकरण खासदार रक्षाताई खडसे यांच्या निधीतून सुरू होते. मात्र पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी झाल्याने काम थांबले आहे. ग्रामनिधी अपुरा असल्याने आमदारांकडे प्रस्ताव पाठवला आहे. निधी मिळाल्यास लवकरच काम सुरू करू.”
3. अतुल प्रभाकर पाटील, वार्ड सदस्य/उपसरपंच :
“ग्रामनिधी पुरेसा नाही. प्रस्ताव आमदारांकडे आहे, निधी मिळताच कामाला सुरुवात करू.”