पुणे : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) गुरुवारी (दि. 18) एकदिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत राज्यभरातील सर्व वैद्यकीय सेवा ठप्प राहणार आहेत.
या आंदोलनाला राज्यातील रुग्णालये, वैद्यकीय सहकारी संघटना यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या परिपत्रकानुसार, सीसीएमपी कोर्स उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आरोग्यसेवा व्यवस्थेची गुणवत्ता व सुरक्षितता धोक्यात येईल, असा आयएमएचा आरोप आहे.