खिर्डी (ता. रावेर) : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत उर्दू शाळांमधील ग्रेडेड मुख्याध्यापक पदे रिक्त असून ती पदोन्नतीद्वारे भरण्यात यावीत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना शाखा जळगावतर्फे करण्यात आली आहे.
मराठी माध्यमातील ग्रेडेड मुख्याध्यापक पदांसाठी गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात येत आहे; मात्र उर्दू माध्यमाच्या पदोन्नत्या अद्याप झालेल्या नाहीत. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी यापूर्वी उर्दू माध्यमातील पदोन्नती करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात कारवाई झालेली नाही.
या संदर्भात संघटनेतर्फे निवेदन सादर करून पदोन्नतीची मागणी करण्यात आली आहे. लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या विषयावर पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ. नबी, जिल्हा सचिव मो. मुख्तार आणि प्रदेशाध्यक्ष मो. हनीफ शेख यांनी स्पष्ट केले.