शिरसाड (ता. यावल) –
गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे कार्यरत असलेले श्री. शेख सर, श्री. दीपक पाटील सर व अटवाल सर यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
विद्यार्थी व पालकवर्ग भावूक होत या शिक्षकांना निरोप दिला. कारण त्यांच्या कार्यकाळात दाखवलेले विद्यार्थ्यांप्रती प्रेम, जिव्हाळा व समर्पण हे अनुकरणीय ठरले.
शिक्षक म्हणजे केवळ वर्गात धडे शिकवणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा खरा मार्गदर्शक असतो. शेख सर, पाटील सर व अटवाल सर यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानच नाही तर आत्मविश्वास, संस्कार व जीवनमूल्ये विद्यार्थ्यांना दिली.
जिव्हाळ्याची शिकवणी, प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष, आणि पालकांशी ठेवलेले स्नेहपूर्ण नाते यामुळे शाळेत शिक्षणाची गोडी निर्माण झाली. त्यांच्या जाण्याने शाळेत आणि गावात एक शून्य निर्माण झाले असून या शिक्षकांचे नाव गावाच्या शैक्षणिक इतिहासात आदराने घेतले जाईल.