जळगाव – उत्तर प्रदेशातील कानपूर येथे फक्त “आय लव्ह मुहम्मद” लिहिल्याबद्दल २५ मुस्लिम तरुणांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या घटनेचा निषेध व्यक्त करत जळगाव जिल्हा एकता संघटनेने राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन पाठविले आहे. या कारवाईला संघटनेने “संविधान व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट हल्ला” असे संबोधले आहे.
एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी सांगितले की, “आय लव्ह मुहम्मद लिहिणे हा कुठल्याही धर्माचा अपमान नसून, भक्ती आणि श्रद्धेची अभिव्यक्ती आहे. त्याला गुन्हा ठरविणे म्हणजे लोकशाहीच्या आत्म्यावर घाला आहे.”
संघटनेने मांडलेल्या मागण्या :
१) निष्पाप तरुणांविरुद्ध दाखल एफआयआर तात्काळ मागे घ्यावा.
२) धार्मिक श्रद्धा व अभिव्यक्तींविरुद्ध असंवैधानिक कारवाई होऊ नये.
३) प्रत्येक नागरिकाला संविधानातील समानता व धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली जावी.
घटनात्मक मुद्दे :
-
कलम १९(१)(अ): अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
-
कलम २५: धर्माचे पालन व प्रचाराचा अधिकार
-
कलम २१: जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क
एकता संघटनेने इशारा दिला की, जर सरकारने हस्तक्षेप करून निष्पाप तरुणांना न्याय दिला नाही, तर ते लोकशाही आणि संविधानाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवेल.
यावेळी फारुख शेख, नदीम मलिक, मुफ्ती खालिद, अधिवक्ता आविश शेख, अनीस शाह, अन्वर सिकलगार, शाहिद शेख आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. हाफिज रहीम पटेल व हाफिज कासिम नदवी यांनी आरडीसी श्रीमती निवृत्ती गायकवाड यांना निवेदन सादर केले.