कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होणार असून, प्रत्यक्ष मतदान नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे. गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकांच्या निवडणूक तयारीचे सविस्तर परीक्षण करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने १६ सप्टेंबर रोजी आदेश देत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण कराव्यात, असे निर्देश आयोगाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विभागनिहाय मतदान यंत्रांची उपलब्धता, त्यातील बिघाड, सुरक्षित साठवणुकीची व्यवस्था, मतदान केंद्रांची संख्या तसेच आवश्यक निवडणूक अधिकार्यांची उपलब्धता याचा सखोल आढावा घेण्यात आला.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडत सप्टेंबरअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अंतिम मतदारसंघ रचनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिकेवर सुनावणी सुरू असून, शुक्रवारी निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केली जाईल.
दरम्यान, नगरपालिका व नगर पंचायतींची अंतिम प्रभाग रचना २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान, तर महापालिकेची रचना ८ ते १२ ऑक्टोबरदरम्यान प्रसिद्ध होणार आहे.