मुंबई : राज्यातील कॅब, रिक्षा आणि टॅक्सीचालक आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. 30 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात जमून महायुतीविरोधात मतदानाची शपथ घेण्याचा त्यांचा निर्धार आहे. हा निर्णय भारतीय गिग कामगार मंचच्या सभेत घेण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली.
सभेत चालकांनी “टेस्ला मंत्री हाय हाय” अशा घोषणा दिल्या. दरम्यान, ओला, उबर व रॅपिडोच्या भाडेदरांबाबत परिवहन विभागाकडे निवेदन दिल्यानंतरही अंमलबजावणी न झाल्याने चालक संतप्त आहेत.
30 सप्टेंबरपूर्वी योग्य दर न मिळाल्यास मोठ्या संख्येने चालक आझाद मैदानात जमून महायुतीविरोधात मतदानाची शपथ घेतील, असा ठराव सभेत करण्यात आला. त्याआधी जनजागृतीसाठी वाहनांवर ‘मा. मोदीजी सुनिये’ असे स्टिकर्स लावण्याचेही जाहीर करण्यात आले.