नाशिक : सन २०२७ मधील सिंहस्थ महापर्वासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सादर केलेल्या तब्बल २,२९१ कोटी रुपयांच्या रस्ते आणि पुलांच्या आराखड्यावर संशय व्यक्त झाला आहे. कुंभमेळा तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या प्राकलनाला फुगवले असल्याचा आरोप करत तपासणीचे आदेश दिले.
गेल्या सिंहस्थात १८८ किमी रस्ते ४८८ कोटींमध्ये झाले होते. यंदा त्याच कामांसाठी हजारो कोटींचा अंदाजपत्रक कसा काय, असा थेट सवाल महाजन यांनी केला.
महाजन यांचे निर्देश :
-
महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्तेविकास महामंडळ यांच्या दरांची तुलना करावी
-
प्रकल्पासाठी केलेल्या अंदाजपत्रकाची चिरफाड करून तपासणी करावी
-
याआधी झालेल्या कामांच्या दरांचा ताळमेळ बसवावा
दरांतील तफावत :
-
सार्वजनिक बांधकाम विभाग : प्रति किमी ₹६ कोटी
-
महापालिका बांधकाम विभाग : प्रति किमी तब्बल ₹१२ कोटी
यामुळे महापालिकेच्या प्राकलनावर संशय निर्माण झाला असून, महाजन यांनी दोन तासांची बैठक घेऊन बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर धरले.