अहिल्यानगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक धक्कादायक घटना उघड झाली असून, नात्याला काळीमा फासणाऱ्या एका नराधमाने स्वतःच्या दूरच्या नात्यातील चार सख्ख्या बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. यात अल्पवयीन मुलींबरोबरच लग्न झालेली मोठी बहीणही वाचू शकली नाही. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घटस्फोटानंतर नातलगाची जबाबदारी
पीडित मुलींच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांची जबाबदारी एका नातलगाकडे सोपवण्यात आली होती. संरक्षण करण्याऐवजी याच व्यक्तीने मुलींवर अत्याचार केल्याचे उघड झाले.
प्रकरणाचा पर्दाफाश
स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पातील कार्यकर्त्यांमुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला. चार महिन्यांपूर्वी लग्न झालेली मोठी बहीण बहिणींना भेटायला आली असता आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. धाडसाने तिने हा प्रसंग पतीला सांगितला. त्यानंतर त्यांनी स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला. संस्थेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर राहुरी पोलिसांनी त्वरीत कारवाई करून चौघी बहिणींना मुक्त केले आणि आरोपी दांपत्याला अटक केली.
पीडित मुलींचं वय व मानसिक धक्का
पीडितांपैकी एक सज्ञान असून उर्वरित तिघी अनुक्रमे १६, १४ आणि १० वर्षांच्या अल्पवयीन आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर वारंवार अत्याचार होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मोठ्या मुलीच्या धाडसामुळेच प्रकरण बाहेर आले.
समाजात संताप
या अमानुष घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. “अल्पवयीन मुलींच्या देखरेखीची जबाबदारी घेतलेल्या नातलगानेच असा घृणास्पद कृत्य करणे, ही समाजाला लज्जास्पद बाब आहे,” अशी प्रतिक्रिया विविध सामाजिक संस्थांनी दिली आहे.
पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, समाजातून या गुन्ह्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.