यावल – तालुक्यातील परसाडे बुद्रुक येथील साहिल तडवी (वय २२) या तरुणाने सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. यावरून यावल पोलिसांनी बुधवारी रात्री गुन्हा दाखल करून साहिलला अटक केली. गुरुवारी न्यायालयाने त्याला २० सप्टेंबरपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
ही कारवाई कमलेश शिके यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अनिल महाजन करत आहेत.
संघटनांकडून निषेध व निवेदन
या घटनेच्या निषेधार्थ बजरंग दल व सकल हिंदू समाजाकडून गुरुवारी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. जिल्हा सहमंत्री राजेश्वर बारी, चेतन पाटील, युवराज बारी, अंकुश घारू, कापूर आदी यावेळी उपस्थित होते.
भाजप पदाधिकाऱ्यांनीदेखील नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे व यावल पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले. यात संबंधित तरुणाविरुद्ध देशद्रोही कृत्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. डॉ. कुंदन फेगडे, उमेश फेगडे, हेमराज फेगडे, नीलेश गडे, नितीन महाजन, भाजप शहराध्यक्ष राहुल बारी आदी यावेळी उपस्थित होते.
पोलिसांची इशारा
“कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणाऱ्या, वैयक्तिक वा सार्वजनिक स्वरूपाच्या वादग्रस्त पोस्ट टाकू नयेत. पोलिसांचे सोशल मीडियावर लक्ष आहे आणि वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा इशारा यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला.