छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ राज्यस्तरीय शुभारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील एक कोटी भगिनींना बिनव्याजी 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. या कर्जामुळे महिलांना छोटा-मोठा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळेल आणि त्या ‘लखपती दीदी’ म्हणून स्वावलंबी बनतील.
महिलांसाठी दुहेरी आधार
याआधी सुरु असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आधार दिला जात आहे. मात्र केवळ या रकमेवर अवलंबून न राहता महिलांना व्यवसायात उतरता यावे, यासाठी नव्या कर्जसहाय्याची तरतूद करण्यात आली आहे.
प्रत्येक गावात पतसंस्था
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक गावात महिलांची पतसंस्था स्थापन केली जाईल. जिल्हा बँकांच्या माध्यमातून हे बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. यामुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन उद्योग, व्यवसायात उतरू शकतील.
मागील वर्षी 25 लाख महिला लखपती
फडणवीस यांनी सांगितले की, मागील वर्षीच राज्यातील 25 लाख महिलांना लखपती बनवण्यात आले असून महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. नव्या योजनेतून एक कोटी भगिनींना याचा लाभ मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या *‘सेवा पंधरवडा’*चा एक भाग आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली 25 कोटी लोक गरिबी रेषेखालून वर आले, तर 15 कोटींना स्वतःचे घर मिळाले, असे फडणवीस यांनी सांगितले.